YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 3

3
वधूचे विचार
1रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली; मी त्याला चोहीकडे पाहिले; पण तो मला आढळला नाही.
2माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून व गल्ल्यांतून करावा; मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही.
3नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय?”
4त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तोच माझा प्राणप्रिय मला भेटला; मी त्याला धरून ठेवले; मी त्याला आपल्या मातृगृही आपल्या जननीच्या कोठडीत आणीपर्यंत सोडले नाही.
5यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका. तो राहील तितका वेळ राहू द्या.
वरात
6गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?
7पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत.
8ते सर्व खड्गधारी व युद्धप्रवीण आहेत; रात्रीच्या समयी प्राप्त होणार्‍या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेला तलवार लटकत आहे.
9शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे.
10त्याचे दांडे रुप्याचे आहेत; त्याची पाठ सोन्याची आहे; त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे; त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे.
11सीयोननिवासी कन्यांनो, बाहेर या, शलमोन राजाला पाहा; त्याच्या विवाहदिवशी, त्याच्या मनाला उल्लास झाला त्या दिवशी, त्याच्या मातेने त्याला घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला, असा हा पाहा.

सध्या निवडलेले:

गीतरत्न 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन