जखर्या 8
8
यरुशलेमेच्या जीर्णोद्धाराचे अभिवचन
1मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोनेसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे; तिच्याकरता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे.
3परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.
4सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे व म्हातार्या, यरुशलेमेच्या गल्ल्यांत आपल्या वृद्धापकाळामुळे हातात काठी घेऊन बसतील.
5नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणार्या मुलामुलींची गर्दी होईल.
6सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवसांत ह्या अवशिष्ट राष्ट्रांना ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
7सेनाधीश परमेश्वर म्हणतो : मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन;
8मी त्यांना घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करतील आणि सत्याने व न्यायीपणाने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.”
9सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “सेनाधीश परमेश्वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने ह्या दिवसांत जे तुम्ही ऐकत आहात, ते तुम्ही आपले हात दृढ करा.
10त्या दिवसांपूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशूबद्दल भाडे मिळत नसे व येणार्याजाणार्यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे; कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले.
11मी पूर्वी होतो तसा ह्या अवशिष्ट लोकांबरोबर असणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
12शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.
13हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”
14कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजले ह्याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो;
15त्याप्रमाणे ह्या दिवसांत यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे; भिऊ नका;
16तुम्ही करायचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजार्याबरोबर खरे बोला; आपल्या वेशीत खरेपणाने वागा व शांतिदायक न्याय करा;
17तुम्ही कोणी मनात आपल्या शेजार्याचे अनिष्ट चिंतू नका; खोट्या शपथेची आवड धरू नका; कारण ह्या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो.
18सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
19“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.
20सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो : राष्ट्रे व अनेक नगरांचे रहिवासी येतील अशी वेळ येईल;
21एका नगराचे रहिवासी दुसर्या नगरास जाऊन म्हणतील, ‘आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू; मीही जातो.’
22पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील.
23सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’
सध्या निवडलेले:
जखर्या 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.