2 इति. 29
29
हिज्कीयाची कारकीर्द
2 राजे 18:1-3
1हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची कन्या.
हिज्कीया मंदिरामधील उपासना पुन्हा चालू करतो
2हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे. 3हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. 4सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. 5तो त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका! देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका. 6आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली. 7त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. 8म्हणून यहूदा व यरूशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांस शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हास माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात. 9म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया, मुले कैदी झाले. 10म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. 11तेव्हा पुत्रांनो आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हास त्याने निवडले आहे.” 12तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयाचा पुत्र महथ आणि अजऱ्याचा पुत्र योएल. मरारी कुळातला अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजऱ्या, गर्षोनी कुळातला जिम्माचा पुत्र यवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन, 13अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या. 14हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी, यदूथूनच्या कुळातील शमाया आणि उज्जियेल. 15मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुद्धतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले. 16परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करून त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तेथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या. 17पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुद्धता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले. 18त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यावरील सर्व भांडे आम्ही शुद्ध केले आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुद्ध केली आहेत. 19राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुद्धी करून आम्ही ती मांडली आहेत. ती आता परमेश्वराच्या वेदीसमोरच आहेत.” 20दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. 21त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्रस्थान आणि यहूदा यांच्या शुद्धीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली. 22त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. 23यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. 24बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. इस्राएलाबद्दल प्रायश्चित होण्यासाठी म्हणून हे विधी याजकांनी केले. समस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती. 25दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेप्रमाणे राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवीची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती. 26त्याप्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले 27मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञा केली. त्यास सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला. 28होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते. 29होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली. 30हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदीत झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली. 31हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणेही आणली. 32मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे नर कोकरे. त्यांचे परमेश्वरास होमार्पण करण्यात आले. 33सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू. 34होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते. 35होमबली पुष्कळ होते. शांत्यर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. याप्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना क्रमवार स्थापित झाली. 36परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदीत झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.
सध्या निवडलेले:
2 इति. 29: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.