2 इति. 30
30
वल्हांडण सण पाळण्यात येतो
1हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांस निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांस पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरूशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.
याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो
2यरूशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले. 3सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरूशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते. 4तेव्हा राजासह सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली. 5बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरूशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता. 6त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता: “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील. 7आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच. 8आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल. 9तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.” 10एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोपे गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली. 11आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरूशलेमेला प्रयाण केले. 12पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला. 13दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरूशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता. 14यरूशलेम मधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या. 15दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बली दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत:ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले. 16देवाचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले. 17येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले. 18एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली. 19तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.” 20राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांस क्षमा केली. 21इस्राएलाच्या प्रजेने यरूशलेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन:पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईली. 22परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवींना राजा हिज्कीया उत्तेजन देत होता. सणाचे सात दिवस आनंदात घालवत लोकांनी शांत्यर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवासमोर पापाची कबूली दिली. 23वल्हांडणाचा सण आणखी सात दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला. 24यहूदाचा राजा हिज्कीयाने एक हजार बैल आणि सात हजार मेंढरे व पुढाऱ्यांनी एक हजार बैल व दहा हजार मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना पवित्र व्हावे लागले. 25यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलातून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते. 26यरूशलेमामध्ये आनंद पसरला होता. इस्राएलचा राजा दावीद याचा पुत्र शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आजतागायत असा आनंदाचा प्रसंग कधी घडलाच नव्हता. 27याजक व लेवी यांनी उठून लोकांस आशीर्वाद देण्याची परमेश्वरास प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वरास ऐकू गेली.
सध्या निवडलेले:
2 इति. 30: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.