YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 2:10-19

शास्ते 2:10-19 IRVMAR

ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती. इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले; आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली; इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत. मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत; तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरीत सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही. परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई. पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.