शास्ते 2:10-19
शास्ते 2:10-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेणेकरून त्यांनी परमेश्वराला चीड आणली. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली; म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करत तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचे अहित होई आणि ते फार संकटात पडत. मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणार्यांच्या हातून सोडवत; तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही. जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून वाचवत असे; कारण त्यांच्यावर लोक जुलूम करत व त्यांना गांजत; ह्यामुळे ते कण्हत असत; म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई. तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत.
शास्ते 2:10-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती. इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले; आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली; इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत. मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत; तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरीत सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही. परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई. पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.
शास्ते 2:10-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर ती संपूर्ण पिढी त्यांच्या पूर्वजांना मिळाल्यानंतर, दुसरी पिढी उदयास आली, ज्यांना याहवेहबद्धल किंवा त्यांनी इस्राएलसाठी काय केले हे माहीत नव्हते. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली. त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली. याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले. जेव्हा इस्राएली राष्ट्र त्यांच्या शत्रूविरुद्ध लढण्यास जात असे, तेव्हा याहवेहचा हात त्यांच्याविरुद्ध असून त्यांचा पराभव होत असे, जसे याहवेहने त्यांना वचन दिले होते. ते भयंकर संकटात होते. तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते उभे केले. तरी देखील त्यांनी आपल्या शास्त्यांचे ऐकले नाही, परंतु व्यभिचारी मनाने इतर दैवतांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना करू लागले. त्वरेने ते आपल्या पूर्वजांच्या मार्गापासून बहकले, ज्यांनी याहवेहच्या आज्ञांचे पालन केले होते. जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती. परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत.