लेवी. 25
25
शब्बाथवर्ष आणि योबेलवर्ष
अनु. 15:1-11
1सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, 2इस्राएल लोकांस असे सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी.
3सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे; 4पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये.
5तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे. 6तरी तुम्हास शब्बाथाच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल; 7आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.
8तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल. 9मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. 10त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
11हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी योबेल #पन्नासावा वार्षिकोत्सववर्ष होय; त्यावर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत; 12कारण ते योबेल वर्ष होय; ते तुम्हाकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
13या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
14तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका.
15तुम्हास तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हास जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हास विकत आहे. 16जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हास खरोखर फक्त काही पिकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल. 17तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे!
18माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल; 19आणि भूमी तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित रहाल.
20तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहणार नाही. 21चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास तीन वर्षाचे पीक देईल. 22मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल.
23जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा; 24म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतुद करावी. 25तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
26आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल. 27तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी. 28पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
29एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील. 30परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
31तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील. 32परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
33एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत. 34लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
35तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे; 36त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे. 37तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको. 38मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
39तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको; 40योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी रहावे व तुझी सेवाचाकरी करावी. 41त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.
42कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये. 43तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर. 44तुमच्या दासदासी; तुमच्या देशासभोवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे.
45तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील; 46तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांस तुम्ही कायमचे गुलाम करून घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेकांवर कठोरपणाने चालवू नये.
47तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल; 48तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्यास सोडवता येईल.
49किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्यास सोडवता येईल किंवा तो स्वत:च धनवान झाला तर त्यास स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करून घेता येईल. 50त्यास विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्यास फक्त थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे!
51योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्यास परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील. 52योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.
53त्याने आपल्या मालकापाशी सालादाराप्रमाणे रहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये. 54जरी त्या मनुष्यास पुन्हा कोणी विकत घेतले नाही, तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुलेबाळे मुक्त होतील. 55कारण इस्राएल लोक माझे दास आहेत; त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
सध्या निवडलेले:
लेवी. 25: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.