YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवी. 26

26
आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
अनु. 7:12-24; 28:1-68
1तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. 2तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.
3तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या, 4तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
5तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल. 6मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.
7तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. 8तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
9मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन; 10तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
11मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही. 12मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल. 13मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!
आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा
14परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत; 15तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला.
16जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. 17मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
18या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन. 19मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन. 20तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
21तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन. 22मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
23एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात, 24तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन.
25मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल. 26मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
27एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला, 28तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन!
29तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल. 30तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
31मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही. 32मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. 33परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.
34जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील. 35देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल. 36तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
37कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार. 38राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. 39तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
40परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील. 41या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील. 42तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.
43त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.
44इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशात असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे. 45त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!
46हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले.

सध्या निवडलेले:

लेवी. 26: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन