YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:28-48

लूक 19:28-48 IRVMAR

येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला. तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले, व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा. जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’” ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले. ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?” ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.” त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते. तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला. ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.” तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला, “कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.” येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला. आणि त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.” तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.