लूक 19:28-48
लूक 19:28-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला. तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले, व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा. जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’” ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले. ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?” ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.” त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते. तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला. ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.” तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला, “कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.” येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला. आणि त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.” तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
लूक 19:28-48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते. जैतून डोंगरावर बसलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की: “समोरच्या गावात जा आणि तेथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा. ‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहा?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभुला त्याची गरज आहे.’ ” ज्यांना पुढे पाठविले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले. ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?” त्यांनी उत्तर दिले, “प्रभुला याची गरज आहे.” त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसवले. जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी त्यांचे अंगरखे रस्त्यावर पसरले. जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले: “प्रभुच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!” “स्वर्गात शांती आणि परमोच्चावर गौरव!” गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.” पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.” जसे ते यरुशलेमेजवळ आले आणि ते शहर पाहिले, त्यावरून ते रडले आणि म्हणाले, “जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टीआड झाल्या आहेत. कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील. ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.” नंतर येशू मंदिराच्या परिसरात आले आणि तेथे विक्री करणार्यास बाहेर घालवून देऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’; पण तुम्ही ‘लुटारूंची गुहा केली आहे.’” त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते. परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.
लूक 19:28-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, “तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हांला आढळेल; ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हांला विचारलेच, तर ‘प्रभूला ह्याची गरज आहे,’ असे सांगा.” तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, “शिंगरू का सोडता?” तेव्हा ते म्हणाले, “प्रभूला ह्याची गरज आहे.” मग त्यांनी ते येशूकडे आणले, आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, “‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा ‘धन्यवादित असो;’ स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.” नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत [व विकत घेत] होते त्यांना तो बाहेर घालवू लागला; आणि त्यांना म्हणाला, “‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल,’ असा शास्त्रलेख आहे; परंतु त्याची तुम्ही ‘लुटारूंची गुहा’ केली आहे.” तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
लूक 19:28-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता. ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात त्याच्याजवळ असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे पोहोचताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू तुम्हांला बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता, असे कोणी तुम्हांला विचारले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा.” ज्यांना पाठवले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचा धनी त्यांना म्हणाला, “शिंगरू का सोडता?” “प्रभूला ह्याची गरज आहे”, त्यांनी उत्तर दिले. त्यांनी ते येशूकडे आणले. आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. तो पुढे जात असता लोक त्यांची वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो ऑलिव्ह डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य आणि लोकसमुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंदित होऊन उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो! स्वर्गात शांती. आणि सर्वोच्च स्वर्गात प्रभूला गौरव.” लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, ते गप्प राहिले, तर धोंडे ओरडू लागतील.” येशू नगरीजवळ आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्याकरिता विलाप करीत म्हणाला, “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आत्ता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. पुढे तुला असे दिवस येणार आहेत की, त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील; तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या लोकांना धुळीस मिळवतील. तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत कारण तुझ्यावर कृपादृष्टी वळवल्याचा समय तू ओळखला नाहीस.” नंतर येशू मंदिरात गेला व तेथे जे विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला. तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घराला प्रार्थनागृह म्हटले जाईल’, असा धर्मशास्त्रलेख आहे, परंतु त्याचा तुम्ही लुटारूंचा अड्डा केला आहे.” तो मंदिरात दररोज प्रबोधन करीत असे. मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करायला पाहत होते. परंतु काय करावे, हे त्यांना सुचेना कारण सर्व लोक त्याची शिकवण मन लावून ऐकत असत.