हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते. जैतून डोंगरावर बसलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की: “समोरच्या गावात जा आणि तेथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा. ‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहा?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभुला त्याची गरज आहे.’ ” ज्यांना पुढे पाठविले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले. ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?” त्यांनी उत्तर दिले, “प्रभुला याची गरज आहे.” त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसवले. जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी त्यांचे अंगरखे रस्त्यावर पसरले. जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले: “प्रभुच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!” “स्वर्गात शांती आणि परमोच्चावर गौरव!” गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.” पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.” जसे ते यरुशलेमेजवळ आले आणि ते शहर पाहिले, त्यावरून ते रडले आणि म्हणाले, “जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टीआड झाल्या आहेत. कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील. ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.” नंतर येशू मंदिराच्या परिसरात आले आणि तेथे विक्री करणार्यास बाहेर घालवून देऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’; पण तुम्ही ‘लुटारूंची गुहा केली आहे.’” त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते. परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.
लूक 19 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 19:28-48
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ