YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:28-48

लूक 19:28-48 MACLBSI

ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता. ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात त्याच्याजवळ असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे पोहोचताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू तुम्हांला बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता, असे कोणी तुम्हांला विचारले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा.” ज्यांना पाठवले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचा धनी त्यांना म्हणाला, “शिंगरू का सोडता?” “प्रभूला ह्याची गरज आहे”, त्यांनी उत्तर दिले. त्यांनी ते येशूकडे आणले. आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. तो पुढे जात असता लोक त्यांची वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो ऑलिव्ह डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य आणि लोकसमुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंदित होऊन उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो! स्वर्गात शांती. आणि सर्वोच्च स्वर्गात प्रभूला गौरव.” लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, ते गप्प राहिले, तर धोंडे ओरडू लागतील.” येशू नगरीजवळ आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्याकरिता विलाप करीत म्हणाला, “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आत्ता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. पुढे तुला असे दिवस येणार आहेत की, त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील; तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या लोकांना धुळीस मिळवतील. तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत कारण तुझ्यावर कृपादृष्टी वळवल्याचा समय तू ओळखला नाहीस.” नंतर येशू मंदिरात गेला व तेथे जे विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला. तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घराला प्रार्थनागृह म्हटले जाईल’, असा धर्मशास्त्रलेख आहे, परंतु त्याचा तुम्ही लुटारूंचा अड्डा केला आहे.” तो मंदिरात दररोज प्रबोधन करीत असे. मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करायला पाहत होते. परंतु काय करावे, हे त्यांना सुचेना कारण सर्व लोक त्याची शिकवण मन लावून ऐकत असत.