मत्त. 27
27
रोमी सुभेदार पिलात याच्यासमोर येशू
मार्क 15:1; लूक 23:1; योहा. 18:28
1जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. 2त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.
यहूदाचा मृत्यू
प्रेषि. 1:18-19
3तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला. 4तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” 5तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. 6मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.” 7तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली. 8त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. 9तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले. 10मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.”
येशूची चौकशी
11मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.” 12पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला. 13म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?” 14परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
15वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. 16तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता. 17म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” 18कारण त्यास कळले होते की, त्यांनी त्यास मत्सराने धरून दिले होते. 19तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.” 20पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले. 21राज्यपालाने त्यांना विचारले, “मी या दोघांतून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, “बरब्बाला.” 22पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!” 23आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!” 24लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.” 25सर्व लोक म्हणू लागले, “त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.” 26मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले.
येशूला वधस्तंभावर खिळतात
मार्क 15:16-20
27नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली. 28त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला. 29मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!” 30आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. 31येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले.
32ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले. 33जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले. 34तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला. 35त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. 36शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. 37आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले. 38दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले. 39जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून 40म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. 41तसेच मुख्य याजकांसह, नियमशास्त्र शिक्षक व वडीलासह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले, 42याने दुसऱ्यांना वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही. हा इस्राएलाचा राजा आहे. असेल, त्याने वधस्तंभावरून खाली यावे आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. 43तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे. 44तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
येशूचे पुनरुत्थान
मार्क 15:33-41; लूक 23:44-49; योहा. 19:28-30
45मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता. 46सुमारे नवव्या ताशी, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 47जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.” 48त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला. 49परंतु त्यांतील दुसरे म्हणाले, “त्याला एकटे राहू द्या, एलीया येऊन त्यास वाचवतो काय, ते आपण पाहू.” 50पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि त्याचा प्राण सोडला.
51पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले. 52कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले. 53ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशूचे पुनरूत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले. 54आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
55तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या. 56त्यांच्यात मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई या तेथे होत्या.
येशूची उत्तरक्रिया
मार्क 15:42-47; लूक 23:20-26; योहा. 19:38-42
57संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता. 58तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला. 59नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. 60आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला. 61मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या.
62त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले. 63ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल#उठेन .’ 64म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” 65पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” 66म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
सध्या निवडलेले:
मत्त. 27: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.