मत्त. 5
5
डोंगरावरचे प्रवचन
लूक 6:20-26
1जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. 2त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला;
3 “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4 ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत,
कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
5 ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत,
कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’
6 जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत,
कारण ते संतुष्ट होतील.
7 जे दयाळू ते धन्य आहेत,
कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
8 जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत,
कारण ते देवाला पाहतील.
9 जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
10 न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11 जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. 12आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे
मार्क 9:50; लूक 14:34
13 तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील. 14तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही. 15आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण
17 नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे. 18कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. 19यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. 20म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.
राग व खून
लूक 12:57-59
21 ‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. 22मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. 23यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, 24तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर. 25तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील. 26मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
अशुद्धता
27 ‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, 28मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे; 29तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. 30तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
31 ‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते. 32मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
शपथ व खरेपणा
33 आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. 34मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे; 35पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे. 36आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. 37तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
सूड
लूक 6:29-31
38 ‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. 39परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; 40जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; 41आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. 42जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.
प्रेम व सर्वांगपूर्ण शील
लूक 6:27-28, 32-36
43 ‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. 44मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. 46कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? 47आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना? 48यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.
सध्या निवडलेले:
मत्त. 5: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.