नहे. 13
13
नहेम्याच्या सुधारणा
गण. 22:1-24:25
1त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही. 2या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले. 3हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले.
4यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात. 5जे लेवी, गायक व द्वारपाल यांच्यासाठी लागणारा धान्याचा दशामांश, नवीन द्राक्षरस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशांची अर्पणे तेथे ठेवली जात.
6परंतु हे घडताना मी यरूशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली, 7आणि मी यरूशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.
8मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले. 9त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
10लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते. 11म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले.
12त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या. 13कोठारांवर या मनुष्यांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते. 14देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.
15यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते.
16सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत. 17यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात. 18तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”
19प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही. 20एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.
21मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत. 22मग मी लेवींना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे.
23त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती. 24आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत परंतु त्यांना यहूदी भाषा येत नव्हती, पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते.
25आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका. 26अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले. 27तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरूद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय?”
28योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्यासमोरून हाकून लावले.
29हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर.
30याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. 31लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली.
हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर.
सध्या निवडलेले:
नहे. 13: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.