नहे. 6
6
विरोधकांच्या कारवाया
1आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते, 2तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, “नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
3तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.” 4सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. 5मग, पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनीसाकरवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते. 6त्यामध्ये असे लिहीले होते.
राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरूशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे.
7“यहूदात राजा आहे, असे स्वत:बद्दल घोषित करायला तू यरूशलेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.”
8तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.” 9आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
10मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून रहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.” 11पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव वाचविण्यासाठी माझ्यासारख्या मनुष्याने मंदिरात का जावे? मी जाणार नाही.”
12शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते. 13मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते. 14देवा, कृपाकरून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे.
15मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरूशलेमेच्या भिंतीचे काम बावन्न दिवसानी समाप्त झाले. 16हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
17त्या दिवसात यहूदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबीया त्यांना उत्तरे देत होता. 18यहूदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्यास वचन दिले होते. कारण, आरहाचा पुत्र शखन्या याचा तोबीया हा जावई होता. तोबीयाचा पुत्र योहानान याचे मशुल्लामच्या कन्येशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र. 19तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत असत.
मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.
सध्या निवडलेले:
नहे. 6: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.