YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रक. 11

11
दोन साक्षीदार
1मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे. 2पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील. 3आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.” 4हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत. 5जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे. 6या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे.
7त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. 8तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. 9आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत. 10त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.
11आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले. 12आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, “इकडे वर या” मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैऱ्यांनी त्यांना पाहिले.
13आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले.
14दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
सातवा कर्णा
15मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः
जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे;
तो युगानुयुग राज्य करील.
16तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले
17हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो,
कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.
18राष्ट्रे रागावली आहेत
परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि
मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि
तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि
जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे.
आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
19तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.

सध्या निवडलेले:

प्रक. 11: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन