YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीत. 4

4
वधूची वराकडून प्रशंसा
1(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस.
तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत.
तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या
शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
2लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे.
त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही.
त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
3तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत.
तुझे मुख सुंदर आहे.
तुझ्या बुरख्याच्या आत,
तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
4तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे.
ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत.
5हरीणीची जी जुळी,
जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात
त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
6दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत.
तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर,
ऊदाच्या टेकडीवर जाईन.
7प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस.
तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
8लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये.
लबानोनातून माझ्याबरोबर ये;
अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये,
सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये,
सिंहाच्या गुहेतून,
चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
9अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू,
तू माझे हृदय हरण केले आहेस.
तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने
तू माझे हृदय चोरले आहेस.
10माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे.
तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो.
तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे.
तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
12माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस.
तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.
13तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत.
त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,
14मेंदी, जटामांसी, केशर,
वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
15तू बागेतल्या कारंज्यासारखी,
ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी,
लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
16(तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये,
माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव.
माझा सखा त्याच्या बागेत येवो
आणि त्याच्या आवडीची फळे खावो.

सध्या निवडलेले:

गीत. 4: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन