YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 14

14
अपरिचित भाषा बोलण्याचे दान
1प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला देवाचा संदेश सांगता यावा अशी उत्कंठा बाळगा. 2अपरिचित भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण तो काय बोलतो, हे कोणालाही समजत नाही; तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गूढ गोष्टी बोलतो. 3संदेष्टा हा माणसांना उद्देशून साहाय्य, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो. 4अपरिचित भाषा बोलणारा स्वतःलाच साहाय्य करतो, संदेष्टा ख्रिस्तमंडळीला साहाय्य करतो.
5तुम्ही सर्वांनी अपरिचित भाषा बोलाव्यात, अशी माझी इच्छा आहे. परंतु विशेषत: तुम्ही संदेश द्यावा, अशी माझी मनीषा आहे; कारण ख्रिस्तमंडळीच्या उन्नतीकरिता अपरिचित भाषांचा अर्थ सांगणारा नसेल, तर जो अपरिचित भाषा बोलतो, त्याच्यापेक्षा देवाचा संदेष्टा श्रेष्ठ आहे. 6तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन अपरिचित भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?
7पावा किंवा वीणा असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वाद्यांच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास, पाव्याचा नाद कोणता आणि वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल? 8तसेच रणशिंग अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? 9त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुमचे शब्द वाऱ्यावर वाहून जातील. 10जगात अनेक भाषा आहेत, तरी एकही अर्थहीन नाही. 11म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणाऱ्याला मी परका ठरेन आणि बोलणारा मला परका ठरेल. 12ज्याअर्थी तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात त्याअर्थी ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी उपयुक्त अशी दाने विपुल प्रमाणात मिळावीत म्हणून तुम्ही प्रयत्न करा.
13अपरिचित भाषा बोलणाऱ्याने आपल्याला त्यांचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14जर मी अपरिचित भाषेत प्रार्थना केली, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा त्या प्रार्थनेत सहभाग नसतो. 15तर मग मी काय करावे? मी आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही प्रार्थना करणार. मी आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. 16तू केवळ आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थनेत आभार प्रदर्शन केले, तर जो तुमच्यातला नाही, तो तुझ्या प्रार्थनेला आमेन कसा म्हणेल? कारण तू जे बोलतोस, ते त्याला समजत नाही. 17तुझे आभार प्रदर्शन करणे चांगले असले, तरीही त्याने दुसऱ्याची उभारणी होत नाही.
18तुमच्या सर्वांपेक्षा मी अपरिचित भाषा अधिक बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. 19तथापि ख्रिस्तमंडळीच्या उपासनेत अपरिचित भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी समजतील असे पाच शब्द बोलणे मला जास्त आवडते.
20बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत लहान मुलांसारखे आणि समजूतदारपणात प्रौढांसारखे व्हा. 21नियमशास्त्रात लिहिले आहे,
‘अपरिचित भाषा बोलणाऱ्या लोकांद्वारे
व परक्या माणसांच्या ओठांनी
मी ह्या लोकांबरोबर बोलेन,
तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत’, असे प्रभू म्हणतो.
22म्हणून ह्या अपरिचित भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी एक चिन्ह आहेत. संदेश विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे.
23सगळी ख्रिस्तमंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर अपरिचित भाषा बोलू लागले आणि बाहेरचे किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर “तुम्ही वेडे आहात”, असे ते म्हणणार नाहीत काय? 24परंतु सर्वच जण देवाचा संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा बाहेरचा माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापांविषयी त्याची खातरी होते, तो जे काही ऐकतो त्या सर्वावरून त्याचा निर्णय होतो, 25त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतील आणि तो लोटांगण घालून देवाला वंदन करील व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरच आहे, असे कबूल करील.
उपासनेत सुव्यवस्थेची आवश्यकता
26बंधुजनहो, तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी प्रबोधन करण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अपरिचित भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी असावे. 27अपरिचित भाषा बोलायच्या असल्यास बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत, अधिक नसावेत. त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि दुसऱ्या एकाने अर्थ सांगावा. 28परंतु अर्थ सांगणारा नसला तर अपरिचित भाषा बोलणाऱ्याने ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे. 29संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. 30तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही संदेश प्रकट झाला, तर जो बोलत आहे त्याने गप्प राहावे. 31सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल, अशा रीतीने तुम्हां सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. 32संदेश देण्याचे कृपादान संदेष्ट्याच्या स्वाधीन असते. 33कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या प्रत्येक ख्रिस्तमंडळीत जशी रीत आहे, 34त्यानुसार स्त्रियांनी ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज्ञापालन करावे. 35त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली, तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने ख्रिस्तमंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.
36देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडेच पोहोचले आहे काय? 37कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे, असे त्याने समजावे. 38कोणी तसे समजत नसल्यास तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
39म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व अपरिचित भाषा बोलण्यास मज्जाव करू नका. 40मात्र सर्व काही उचितपणे व व्यवस्थितपणे होऊ द्या.

सध्या निवडलेले:

1 करिंथ 14: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन