1 करिंथ 16
16
यरुशलेममधील गोरगरिबांसाठी निधी
1आता पवित्र जनांसाठी निधी गोळा करण्याविषयी मी गलतीयातील ख्रिस्तमंडळ्यांना आदेश दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. 2तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल, त्या मानाने आपणाजवळ प्रत्येक रविवारी द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की, मी येईन तेव्हा ते गोळा केले जाऊ नये. 3मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही मान्यता द्याल त्यांना तुमचे दान यरुशलेम येथे पोहोचविण्याकरता मी पत्रे देऊन पाठवीन. 4मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील.
खासगी बाबी व निरोप
5मी मासेदोनियामधून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियामधून जाणार आहे. 6कदाचित मी तुमच्याजवळ राहीन, कदाचित हिवाळाही घालवीन, अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे जाण्यासाठी तुम्ही मला साहाय्य करू शकाल. 7तुम्हांला केवळ धावती भेट द्यावी, अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याबरोबर राहण्याविषयी आशा बाळगून आहे.
8पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन; 9कारण पुष्कळ विरोधक जरी असले, तरीही परिणामकारक अशा कार्यासाठी मला तेथे पुष्कळ वाव आहे.
10तेथे तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ आपल्याच घरी असल्यासारखे राहावे, असे त्याचे आदरातिथ्य करा; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे. 11कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे माझ्याकडे पाठवा. बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.
12आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली. तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा नाही, मात्र पुढे संधी मिळेल, तेव्हा तो येईल.
13सावध असा, विश्वासात स्थिर राहा, निर्भय बना, सशक्त व्हा. 14तुम्ही जे काही करता, ते सर्व प्रीतीने करावे.
15बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनच्या घराण्याची माहिती आहे. ते अखया येथील प्रथम फळ आहे आणि त्याने स्वतःला पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. 16अशा लोकांना आणि जो कोणी सेवाकार्यात साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो.
17स्तेफन, फर्तूनात व आखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे. तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. 18त्यांनी जसा तुम्हांला हुरूप आणला होता, तसाच मलाही हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांची दखल घ्या.
19आशियातल्या ख्रिस्तमंडळ्यांच्या तुम्हांला शुभेच्छा आहेत. अक्विला, प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती, तुम्हांला प्रभूमध्ये हार्दिक शुभेच्छा देत आहे. 20सर्व बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. बंधुभावात्मक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या.
21माझ्या, पौलाच्या स्वतःच्या, तुम्हांला शुभेच्छा - हे मी स्वतःच्या हाताने लिहीत आहे.
22जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. आमच्या प्रभो, ये!
23प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.
24ख्रिस्तामध्ये माझी प्रीती तुम्हां सर्वांवर असो, आमेन.
सध्या निवडलेले:
1 करिंथ 16: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.