YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 9

9
पौलाचे निवेदन
1मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? प्रभूमध्ये केलेल्या सेवाकार्याचे फळ मला तुमच्यामध्ये दिसत नाही काय? 2जरी मी दुसऱ्या लोकांच्या दृष्टीने प्रेषित नसलो, तरी निदान तुमच्याकरिता तरी आहे; कारण प्रभूवरच्या निष्ठेत मी प्रेषित असल्याची तुम्ही पावती आहात.
3माझ्यावर टीका करणाऱ्यांना माझे हेच उत्तर आहे. 4आम्हांला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय? 5इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व पेत्र ह्यांच्याप्रमाणे आम्हांला आमची ख्रिस्ती पत्नी प्रवासात बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? 6अथवा कामधंदा करून उपजीविका करण्याचा हक्क केवळ मला व बर्णबाला नाही काय? 7आपल्याच खर्चाने सैन्यात काम करतो, असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध पीत नाही, असा कोण आहे?
8माणसाच्या रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांची मर्यादा घालून घेण्याची मला गरज नाही कारण नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय? 9मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नको, तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की, 10तो हे तुमच्याआमच्याकरता सांगतो? हो, हे तुमच्याआमच्याकरता लिहिले आहे, अशा अर्थाने की जो नांगरतो, त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. 11आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक वस्तूंची कापणी केली, तर त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? 12दुसरे लोक जर तुमच्या ह्या हक्‍कांचा उपभोग घेतात तर तो आम्ही अधिक प्रमाणात घेऊ नये काय?
तथापि हा हक्क आम्ही बजावला नाही, एवढेच नव्हे तर ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला काही अडथळा होऊ नये म्हणून आम्ही सर्व काही सहन करतो. 13मंदिरात सेवा करणारे मंदिरातल्या उत्पन्नावर आपली उपजीविका चालवतात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 14त्याचप्रमाणे प्रभूची योजना आहे की, जे शुभवर्तमान सांगतात त्यांनी शुभवर्तमानावर आपली उपजीविका करावी.
15मी तर ह्यांपैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला मिळावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही; कारण त्यापेक्षा मी मरावे हे बरे, हा रास्त स्वाभिमान कोणीही फोल ठरवणार नाही. 16मी शुभवर्तमान घोषित करतो म्हणून मला फुशारकी मारण्याचे कारण नाही; कारण मला तसा आदेश देण्यात आला आहे. मी शुभवर्तमान घोषित केले नाही, तर माझा धिक्कार असो! 17हे जर मी स्वेच्छेने करीत असेन, तर मला पारितोषिक मिळेल आणि स्वेच्छेने नसेल, तरी माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवली आहे व माझे कर्तव्य म्हणून मी ती पार पाडीत आहे. 18तर मग माझे पारितोषिक काय? माझे पारितोषिक ते हेच की, शुभवर्तमान विनामूल्य सांगण्याची जी संधी मला मिळाली आहे, ती पार पाडताना मला जे काम करावे लागते त्याबाबतच्या माझ्या हक्कांचा मी दावा करत नाही.
लोकसंग्रह करण्याविषयी पौलाची आस्था
19कारण मी सर्वार्थाने स्वतंत्र असूनही, अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. 20यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांमध्ये यहुदी माणसासारखा राहतो; नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसताही, त्यांच्यासारखा झालो. 21जे नियमशास्त्राच्या बाहेर आहेत त्यांना मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राच्या बाहेर असा झालो. मी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर मी ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होतो. 22दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे.
23मी शुभवर्तमानामुळे मिळणाऱ्या आशीर्वादात सहभागीदार व्हावे म्हणून, मी सर्व काही शुभवर्तमानाकरिता करतो.
विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
24शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण पारितोषिक एकालाच मिळते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग असे धावा की, तुम्हांला ते मिळेल. 25स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. 26म्हणून मीही माझे लक्ष्य नजरेसमोर ठेवून धावतो; तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही, 27मी दुसऱ्यांना शर्यतीसाठी बोलावताना कदाचित मी स्वतः मात्र त्या स्पर्धेसाठी अपात्र ठरेन म्हणून मी माझ्या शरीराला कष्ट देऊन त्याला ताब्यात ठेवतो.

सध्या निवडलेले:

1 करिंथ 9: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन