1 पेत्र 4
4
पापाचा त्याग करणे
1ख्रिस्ताने दैहिक दुःख सोसले. तुम्हीही तीच मनोवृत्ती धारण करा, कारण जो दैहिक दुःख सहन करतो, तो पापाकडे पाठ फिरवतो! 2म्हणून तुम्ही आपले ऐहिक आयुष्य मानवी वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. 3कारण यहुदीतर लोकांना आवडणारी कृत्ये करण्यात, म्हणजे स्वैराचार, कामासक्ती, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व बेकायदेशीर मूर्तिपूजा ह्यांत जो काळ गेला तितका पुरे. 4तुम्ही त्यांच्या बेतालपणात सामील होत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमच्याविरुद्ध दुर्भाषण करतात. 5परंतु जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे, त्या न्यायाधीशाला त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे. 6म्हणूनच शुभवर्तमान मृतांनाही सांगण्यात आले होते, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवासमोर जगावे.
7सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. 8मुख्यतः एकमेकांवर आस्थेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. 9कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. 10प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रणाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. 11शुभवर्तमान सांगणाऱ्याने देवाचा संदेश सांगावा. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत या भावनेने करावी, ह्यासाठी की, सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव व्हावा. गौरव व पराक्रम ही युगानुयुगे त्याची आहेत. आमेन.
ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्व
12प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांला द्यावी लागली आहे तिच्यामुळे आपल्याला काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका. 13उलट, ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्याअर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे वैभव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल. 14ख्रिस्ताच्या नावाकरिता तुमचा अपमान होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवशाली आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन विसावला आहे. 15मात्र खून करणारा, चोर, गुन्हेगार किंवा खोडसाळ म्हणूनदेखील कोणी दुःख भोगू नये. 16ख्रिस्ती म्हणून कोणाला दुःख सहन करावे लागत असेल, तर त्याला त्याची लाज वाटू नये, तर त्याने आपण हे नाव धारण करतो म्हणून देवाचा गौरव करावा.
17देवाच्या प्रजेपासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे, तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या शुभवर्तमानाचा अवमान करणाऱ्याबरोबर त्याचा शेवट कसा होईल? 18पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे,
नीतिमान माणसाचे तारण होणे
जर अवघड असते,
तर भक्तिहीन व पापी लोकांची अवस्था
काय होईल?
19म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत स्वतःला विश्वसनीय निर्माणकर्त्याच्या स्वाधीन करावे.
सध्या निवडलेले:
1 पेत्र 4: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.