YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 1

1
शुभेच्छा
1देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आदेशानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, विश्वासातील माझे एकनिष्ठ लेकरू तीमथ्य ह्याला:
2देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू तुम्हांला कृपा, दया व शांती देवो.
खोट्या शिक्षणाविषयी इशारा
3मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे 4व अफवांना खतपाणी घालणाऱ्या दंतकथा व प्रदीर्घ वंशावळ्या ह्यामध्ये त्यांनी गुंतून राहू नये तर श्रद्धेने ईश्‍वरी योजना जाणून घेता येते, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे. 5ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, निर्मळ सदसद्विवेकबुद्धीत व अस्सल विश्वासात उद्भवणारी प्रीती उत्तेजित व्हावी. 6हे सोडून कित्येक लोक निरर्थक चर्चेकडे वळले आहेत.
7ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी ठामपणे सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही. 8नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील, तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे, 9तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे, 10जारकर्मी, लैंगिक विपर्यास करणारे, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे व शिकवणीविरुद्ध वागणारे ह्यांच्यासाठी केलेले आहे. 11धन्यवादित देवाच्या गौरवशाली शुभवर्तमानाला जी साजेशी आहे ती शिकवण आमच्याकडे सोपविण्यात आली आहे.
ख्रिस्तकृपेबद्दल पौलाने दाखविलेली कृतज्ञता
12ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. 13जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली. 14येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला. 15ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी सर्वप्रथम आहे. 16जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली. 17शाश्वत राजा, अविनाशी आणि अदृश्य असा एकच देव ह्याचा सन्मान व गौरव युगानुयुगे होवो! आमेन.
18माझ्या मुला तीमथ्य, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या भविष्यवाणीनुसार हा आदेश मी तुला देऊन ठेवतो की, तू त्या संदेशाद्वारेच श्रद्धेने व चांगल्या सदसद्विवेकबुद्धीने सुयुद्ध कर. 19कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले, 20त्यांत हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत. त्यांनी दुर्भाषण करण्याचे सोडून द्यावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य 1: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन