प्रेषितांचे कार्य 10
10
पेत्र व कर्नेल्य
1कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा एक पुरुष इटालियन नावाच्या पलटणीत अधिकारी होता. 2तो धार्मिक होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, पुष्कळ दानधर्म करणारा व देवाचा नित्य धावा करणारा होता. 3त्याने एकदा दुपारी तीनच्या सुमारास दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपल्याकडे देवाचा दूत येत असून, “कर्नेल्य”, अशी आपल्याला हाक मारत आहे.
4तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?”, त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व दानधर्म हे देवापुढे आठवणीसाठी पोहचले आहेत व तो तुला उत्तर देणार आहे. 5आता तू यापो येथे माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात. 6तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.”
7जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता, तो निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या घरच्या दोघा चाकरांना व त्याच्या व्यक्तिगत सेवेसाठी नेमलेल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले 8आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती देऊन यापो या गावी पाठवले.
9दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला, 10त्याला भूक लागून काही खावेसे वाटले पण जेवणाची तयारी होत आहे, इतक्यात त्याला गाढ तंद्री लागली. 11आकाश उघडले आहे व मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे, असा त्याने दृष्टान्त पाहिला. 12त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पक्षी होते. 13त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.”
14परंतु पेत्र म्हणाला, “नको, प्रभो, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”
15दुसऱ्यांदा त्याला वाणी ऐकू आली, “देवाने जे शुद्ध केले आहे. ते तू निषिद्ध मानू नकोस.” 16असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
17आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा, ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्यने पाठवलेली माणसे शिमोनचे घर शोधत त्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी राहिली, 18त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?”
19पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता पवित्र आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध घेत आहेत. 20ऊठ, खाली जा आणि मनात काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे.” 21पेत्र खाली येऊन त्या माणसांना म्हणाला, “पाहा, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो मी आहे. तुम्ही येथे कशाकरिता आला आहात?”
22ते म्हणाले, “रोमन अधिकारी कर्नेल्य हा सद्गृहस्थ असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याला आदरणीय मानतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की, आपल्याला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.” 23पेत्राने त्यांना आत बोलावून त्यांना रात्रभर तेथे ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापो येथील बंधुजनांपैकी काही जण त्याच्याबरोबर गेले.
24दुसऱ्या दिवशी तो कैसरिया येथे पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्याची वाट पाहत होता.
25पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. 26पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभा राहा, मीही मनुष्यच आहे.” 27मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. 28त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य लोकांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे येAजा करणे हे त्याच्या रीतिरिवाजांविरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये, असे देवाने मला सांगितले आहे. 29म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी आढेवेढे न घेता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?”
30कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या घरी प्रार्थना करत होतो. ही प्रार्थना करीत असताना तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यासमोर उभा राहून मला म्हणाला, 31‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे. 32तर यापो येथे कोणाला पाठवून पेत्र या नावाने राहणाऱ्या शिमोनाला बोलावून आण, तो समुद्रकिनारी शिमोन चर्मकाराच्या घरी पाहुणा आहे.’ 33म्हणून मी माणसांना आपल्याकडे तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपल्याला निर्देश देऊन सांगितले आहे, ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.”
पेत्राचे भाषण
34पेत्राने बोलण्यास आरंभ केला: 35‘देव पक्षपाती नाही, हे आता माझ्या पक्के ध्यानात आले आहे. प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. 36येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे. 37योहानने बाप्तिस्मा घोषित केल्यानंतर गालीलपासून प्रारंभ होऊन तो संदेश सर्व यहुदियामध्ये पसरला. 38नासरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला कारण देव त्याच्याबरोबर होता. 39त्याने यहुदी लोकांच्या देशात व यरुशलेम नगरात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी त्याला क्रुसावर चढवून मारले. 40परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले. 41पण ते प्रकटीकरण सर्व लोकांसमोर न करता जे साक्षीदार देवाने पूर्वी निवडले होते त्या आम्हांसमोर केले; तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही खाणेपिणे केले. 42त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, लोकांना घोषणा करुन सांगा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. 43त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.”
यहुदीतरांवर पवित्र आत्मा उतरतो
44पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा उतरला. 45यहुदीतरांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या व सुंता झालेल्या श्रद्धावंत लोकांना आश्चर्य वाटले; 46कारण त्यांनी त्यांना अपरिचित भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. 47पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांना पाण्याने बाप्तिस्मा दिला जाऊ नये अशी कोण मनाई करेल?” 48येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना बाप्तिस्मा दिला जावा, अशी त्याने आज्ञा केली. त्यांनी त्याला विनंती केली की, त्याने काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे.
सध्या निवडलेले:
प्रेषितांचे कार्य 10: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.