प्रेषितांचे कार्य 16
16
लुस्त्र येथे तीमथ्य पौलाला जाऊन मिळतो
1पौल दर्बे व लुस्त्र येथे आला. तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. मात्र त्याचे वडील ग्रीक होते. 2लुस्त्र व इकुन्य येथील बंधू त्याचा आदर करत होते. 3त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती, त्या ठिकाणी जे यहुदी होते, त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप ग्रीक आहे, हे सर्वांना ठाऊक होते. 4त्यांनी नगरांमधून जाताना यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन ह्यांनी जे ठराव केले होते, ते त्यांना पाळावयास सांगितले. 5अशा प्रकारे ख्रिस्तमंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत गेली.
आशिया मायनरमधून पौलाचा प्रवास
6आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रदेशांतून गेले 7आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. 8म्हणून ते मुसियाजवळून त्रोवस येथे गेले. 9तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा एक माणूस उभा राहून त्याला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.” 10त्याला असा दृष्टान्त झाल्यावर त्या लोकांना शुभवर्तमान सांगावयास देवाने आम्हांला बोलावले आहे, असे समजून आम्ही मासेदोनियात जाण्याचा निर्णय लगेच घेतला.
लुदियाचे परिवर्तन
11त्रोवस पासून हाकारून आम्ही सरळ समथ्राकेस येथे गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस नगरास पोहोचलो. 12तेथून फिलिप्पै या ठिकाणी गेलो. ते मासेदोनिया ह्या प्रमुख जिल्ह्यातील शहर होते व तेथे रोमन लोकांची वसाहत होती. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. 13तेथे साबाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले, तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. 14तेथे लुदिया नावाची एक स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती व जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. 15तिने व तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी खरोखर प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत असाल, तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहामुळे ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.
16आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता एक तरुण दासी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती भविष्य वर्तवून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे. 17ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन ओरडून म्हणत असे, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत! हे तुम्हांला तारणाच्या मार्गाविषयी सांगतात!” 18असे ती पुष्कळ दिवस करीत असे. शेवटी पौलाला या गोष्टीचा वीट आल्यामुळे मागे वळून तो त्या पिशाच्चाला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला हुकूम करतो, तू हिच्यामधून निघून जा” आणि ते तत्काळ निघून गेले.
पौल व सीला ह्यांचा बंदिवास व सुटका
19आपल्या मिळकतीची संधी गेली, असे पाहून तिच्या धन्याने पौल व सीला ह्यांना धरून चौकात अधिकाऱ्यांसमोर ओढून नेले. 20त्यांनी त्यांना रोमन अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहुदी असून आमच्या शहराला फार त्रास देतात. 21आम्हा रोमन लोकांना बेकायदेशीर वाटतात व आम्ही ज्या रूढी स्वीकारुन पाळू शकत नाही अशा हे शिकवत असतात.” 22तेव्हा लोक त्यांच्यावर खवळले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना चाबकाने मारण्याचा आदेश दिला.
23पुष्कळ मारहाण केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकून त्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. 24त्याला असा हुकूम मिळाल्यावर तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले.
25मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते. 26तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या. 27तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जागे होऊन जेव्हा तुरुंगाचे दरवाजे उघडे पाहिले, तेव्हा बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःचा घात करण्याच्या बेतात होता. 28इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.”
29दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला 30आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?”
31त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” 32नंतर त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. 33रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. 34त्यानंतर त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले. त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळींनी आपण आता देवावर श्रद्धा ठेवत आहोत म्हणून आनंदोत्सव केला.
35दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकाऱ्यांनी शिपाई पाठवून तुरुंगाधिकाऱ्यास आदेश दिला, “त्या माणसांना सोडून दे.”
36तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौलाला असे सांगितले, “तुम्हांला सोडावे म्हणून वरिष्ठांनी आदेश पाठवला आहे, तर आता शांतीने जा.”
37परंतु पौल शिपायांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून तुरुंगात टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे पाठवतात काय? हे चालणार नाही, त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”
38शिपायांनी हे अधिकाऱ्यांना सांगितले. ते रोमन नागरिक आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. 39म्हणून त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना बाहेर आणून शहर सोडून जाण्याची विनंती केली. 40ते तुरुंगातून निघून लुदियाच्या घरी गेले. तेथे बंधुजनांना भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तिथूनच ते मार्गस्थ झाले.
सध्या निवडलेले:
प्रेषितांचे कार्य 16: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.