इब्री 13
13
व्यावहारिक बोध
1ख्रिस्ती बंधुभगिनी म्हणून प्रीतीत टिकून राहा. 2आदरातिथ्याचा विसर पडू देऊ नका; त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे. 3तुरुंगात पडलेल्यांबरोबर तुम्ही तुरुंगात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहात म्हणून पीडितांची आठवण ठेवा.
4लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.
5तुम्ही द्रव्यलोभापासून अलिप्त राहा; जे तुमच्याजवळ आहे तेवढ्यावर तृप्त रहा; कारण परमेश्वराने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही’. 6म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या,
प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे,
मी भिणार नाही;
मनुष्य माझे काय करणार?
अधिकाऱ्यांची निष्ठा
7पूर्वी जे तुमचे आधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुगे सारखाच आहे. 9विविध आणि विचित्र प्रकारच्या शिकवणुकींनी बहकून जाऊ नका; अन्नविषयक नियमांनी नव्हे कारण हे नियम जे पाळतात त्यांना त्यांचा काही लाभ होत नाही. कृपेच्या सामर्थ्याने अंतःकरण मजबूत करणे हितावह आहे.
10मंडपात आराधना करणाऱ्या यहुदी याजकांना वेदीवर अर्पण केलेले अन्न खाण्याचा अधिकार नाही. 11यहुदी प्रमुख याजक आपल्या पापांबद्दल क्षमा मिळावी म्हणून पशूंचे रक्त पवित्र स्थानात घेऊन जातात परंतु त्या पशूंची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात. 12म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून नगराच्या प्रवेशद्वाराबाहेर मरण सोसले, 13तर आता आपण त्याबद्दल विटंबना सोशीत छावणीबाहेर त्याच्याजवळ जाऊ या. 14कारण आपल्याकरिता येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. 15ज्या ओठांनी आपण त्याचा देव म्हणून स्वीकार करतो, त्या ओठांचे फळ म्हणून आपण स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करू या. 16चांगले करण्यास व एकमेकांना साहाय्य करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
17तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे, हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, दुःखी मनाने नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
शेवटचा संदेश
18आमच्यासाठी प्रार्थना करा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ आहे, अशी आमची खातरी आहे. 19मी शक्य तेवढ्या लवकर तुमच्याकडे यावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा, अशी मी तुम्हांला आवर्जून विनंती करीत आहे.
समारोपाची प्रार्थना
20आता ज्या शांतिदात्या देवाने शाश्वत कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यांतून उठविले, 21तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.
22बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे. 23आपला बंधू तीमथ्य ह्याची तुरुंगातून सुटका झाली आहे, हे मी तुम्हांला कळवू इच्छितो. तो लवकर आला, तर मी तुमच्या भेटीस येईन तेव्हा त्याला बरोबर आणीन.
24तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र लोकांना आमच्या शुभेच्छा सांगा. इटलीतील बंधूंजन तुम्हांला शुभेच्छा देतात.
25तुम्हां सर्वांवर देवाची कृपा राहो.
सध्या निवडलेले:
इब्री 13: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.