YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 3

3
प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ
1पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण जाहीर करीत असलेल्या श्रद्धेचा प्रमुख याजक येशू ह्याचा विचार करा. 2जसा मोशे त्याच्या कार्यात देवाच्या घरात विश्वासू होता तसा येशूदेखील ज्याने त्याची निवड केली त्याच्याशी विश्वासू होता. 3ज्याप्रमाणे घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू मोशेपेक्षा अधिक सन्मानाला पात्र आहे. 4प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व काही बांधणारा देवच आहे. 5जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी देवाच्या घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. 6ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता. आपल्या आशेसंबंधी धैर्य व आत्मविश्वास यांमध्ये पारपर्यंत टिकून राहिल्यास आपण देवाचे घर आहोत.
7ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे,
आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
8तर रानांतील परीक्षेच्या दिवशी
इस्राएल लोकांनी बंड पुकारले त्याप्रमाणे
तुम्ही आपली मने कठीण करू नका.
9परमेश्वर म्हणतो,
तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी
कृत्यें बघितली होती,
तरी मला कसोटीला लावून
माझी परीक्षा पाहिली.
10त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो,
हे सतत बहकलेल्या अंतःकरणाचे लोक आहेत,
त्यांनी माझे मार्ग ओळखले नाहीत;
11म्हणून मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो,
जेथे मी त्यांना विसावा दिला असता,
तेथे ते निश्चित पोहोचणार नाहीत.
शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता
12बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके विश्वासहीन दुष्ट मन तुमच्यांत कोणाचेही असू नये म्हणून जपा. 13उलट, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना रोज बोध करा, हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण अंत:करणाचे होऊ नये; 14कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. 15धमर्र्शास्त्रात असे म्हटले आहे,
आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
तर इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले,
त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका.
16देवाची वाणी ऐकून त्याच्याविरुद्ध बंड पुकारणारे लोक कोण होते? ज्यांना मोशेने मिसरमधून बाहेर काढले होते, तेच सर्व नव्हते काय? 17चाळीस वर्षे देव कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? 18आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की, “तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? 19ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना तेथे प्रवेश करता आला नाही.

सध्या निवडलेले:

इब्री 3: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन