YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलेमोन 1

1
विषयप्रवेश
1आमचा प्रिय सहकारी फिलेमोन, तुझ्या घरात जमणारी ख्रिस्तमंडळी, आमची भगिनी अफ्फिया व आमचा सहसैनिक अर्खिप्प, तुम्हां सर्वांना 2ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:
3देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.
पळून गेलेल्या गुलामाच्या वतीने विनंती
4-5सर्व पवित्र लोकांवर असलेली तुझी प्रीती व प्रभू येशूवरील तुझा विश्वास ह्यांच्याविषयी ऐकून मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे आभार मानतो. 6मी प्रार्थना करतो की, श्रद्धेमधील तुझी सहभागिता परिणामकारक व्हावी व त्यामुळे जे चागले आपण ख्रिस्तासाठी करावे ते तुम्ही समजून घ्यावे. 7तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व मला प्रोत्साहन मिळाले कारण हे बंधो, तू पवित्र लोकांची अंतःकरणे उल्लसित केली आहेत.
8ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते. 9परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे. 10मी तुरुंगात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला तो माझा पुत्र अनेसिम ह्याच्याविषयी विनंती करतो. 11तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, परंतु आता तुला व मलाही उपयोगी आहे.
12मला प्राणप्रिय असलेल्या त्याला, मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. 13शुभवर्तमानामुळे मी तुरुंगात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. 14पण तू मला साहाय्य करावे, हे मला तुझ्यावर लादायचे नाही, तर तू हे स्वेच्छेने करावे, अशी माझी इच्छा आहे.
15कदाचित तो तुझ्यापासून थोडा वेळ वेगळा झाला, ते अशाकरिता असेल की, त्याने सदासर्वकाळ तुझे व्हावे. 16त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो किती तरी प्रिय आहे आणि तुला एक दास म्हणून व प्रभूमध्ये एक बंधू म्हणून किती तरी अधिक प्रिय होईल.
17म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. 18त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड. 19हे मी, पौलाने स्वतः लिहिले आहे. मी तुझी परतफेड करीन. माझे तुझ्यावर किती उपकार आहेत, ह्याविषयी मी काही बोलत नाही. 20हे बंधो, प्रभूसाठी माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्तामध्ये माझा बंधू म्हणून मला आनंदित कर!
21तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की, मी जे सांगतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.
समारोप
22तसेच माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव; कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे माझे तुमच्याकडे परत येणे होईल, अशी मला आशा आहे.
23ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास 24आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला शुभेच्छा कळवतात.
25आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.

सध्या निवडलेले:

फिलेमोन 1: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन