YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 18

18
महान नगरीचा अधःपात
1त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या तेजाने पृथ्वी उजळून निघाली. 2तो जोरदार वाणीने म्हणाला, “पडली! महान बाबेल पडली. ती भुतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे. 3कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अमर्याद विषयभोगाने धनवान झाले.”
4मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली:
“माझ्या लोकांनो,
तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये
आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील
कोणतीही विपत्ती ओढवू नये
म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.
5कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत
पोहचली आहे आणि तिच्या अनीतीची
देवाने दखल घेतली आहे.
6जसे तिने दिले, तसे तिला द्या,
तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या.
तिने प्याल्यात जितके ओतले,
त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता.
7ज्या परिमाणाने तिने आपला गौरव
केला व विषयभोग घेतला,
त्या परिमाणाने तिला पीडा व दुःख द्या.
कारण ती आपल्या मनात म्हणते,
‘मी राणी होऊन बसले आहे,
मी विधवा नाही.
मी दुःख पाहणारच नाही!’
8ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे रोगराई,
शोक व दुष्काळ एका दिवशीच येतील
आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल.
कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभू
देव सामर्थ्यवान आहे.”
9पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला, ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा ते तिच्याकरता ऊर बडवून शोक करतील. 10तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचे त्यांना भय वाटते म्हणून ते दूर उभे राहतील आणि म्हणतील, ‘किती भयंकर! किती किळसवाणे! अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती! एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.’
11पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. 12सोने, रूपे, मौल्यवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अत्यंत मौल्यवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषणाची पात्रे. 13दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, ऑलिव्ह तेल, पीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मानवी जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. 14व्यापारी तिला म्हणतात, ‘ज्या चांगल्या गोष्टी मिळवण्याची तुला उत्कंठा लागली होती त्या नष्ट झाल्या आहेत. तुझी धनदौलत व विलासाची साधने नाहीशी झाली आहेत व ती पुढे कोणाला मिळणार नाहीत!’ 15तिच्या साहाय्याने धनवान झालेले व्यापारी रडत व शोक करीत, तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील. 16आणि म्हणतील, ‘अरेरे, ह्या महान नगरीची दशा किती भयंकर व किती किळसवाणी झाली आहे! तागाची तलमवस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!’ 17एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.
सर्व तांडेल, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व जण, खलाशी व समुद्रावर जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर उभे राहिले 18आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करीत म्हणाले, “ह्या महान नगरीसारखी दुसरी नगरी नव्हती!” 19त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, “अरेरे, किती भयंकर ही दुर्दशा! जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबतांचे सगळे मालक श्रीमंत झाले ती महान नगरी! तिची एका घटकेत राख झाली!
20हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्या विनाशाविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला न्याय मिळवून दिला आहे!”
21नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, “अशीच ती महान नगरी बाबेल, हिंसक रीतीने टाकली जाईल व ह्यापुढे कधीही सापडणार नाही. 22वीणा, पावा व कर्णा वाजविणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणार नाही. कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणार नाही आणि जात्याचा आवाज ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. 23दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!”
24बाबेलला शिक्षा करण्यात आली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र लोकांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.

सध्या निवडलेले:

प्रकटी 18: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन