YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 20

20
एक हजार वर्षे सैतान बंदिस्त
1नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली होती व त्याच्या हाती एक वजनी साखळदंड होता. 2त्याने दियाबल व सैतान म्हटलेला प्राचीन साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग विवरात टाकून दिले. 3ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे.
4नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना केली नव्हती आणि आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर त्याची खूण धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यानी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. 5मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हे मृतांचे पहिले पुनरुत्थान. 6पहिल्या पुनरुत्थानात समाविष्ट असलेले धन्य व आशीर्वादित आहेत. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालत नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
सैतानाची मुक्तता व शेवटची लढाई
7ती हजार वर्षे पूर्ण झाल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल. 8आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यांतील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांना लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी आहे. 9त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र फिरून पवित्र जनांची छावणी व देवाला प्रिय असलेले नगर वेढले, परंतु स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना भस्म केले. 10नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.
सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय
11नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या समोरून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले आणि ते पुन्हा दिसले नाहीत. 12मग मृत लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी गुंडाळ्या उघडल्या गेल्या, तेव्हा आणखी एक गुंडाळी उघडली गेली. ती जिवंत लोकांची होती. त्या गुंडाळ्यांमध्ये जे लिहिले होते त्यानुसार मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला. 13त्यानंतर समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर टाकले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्या हाती असलेल्या मृतांना बाहेर सोडले. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. 14तेव्हा मृत्यू व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. 15ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.

सध्या निवडलेले:

प्रकटी 20: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन