YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 12

12
नवीन जीवनक्रम
1बंधुजनहो, मी देवाच्या महान करुणेमुळे तुम्हांला आवाहन करतो की, तुम्ही आपली शरीरे सजीव, पवित्र व ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावीत, ही खरी उपासना आहे. 2देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.
आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग
3मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा. 4जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत व त्या सर्व अवयवांची कामे निरनिराळी आहेत, 5तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. 6आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेनुसार आपल्याला विविध कृपादाने मिळाली आहेत. आपल्या विश्वासाच्या प्रमाणात संदेश देणाऱ्याने संदेश देण्यात, 7सेवा करणाऱ्याने सेवा करण्यात, शिक्षण देणाऱ्याने शिक्षण देण्यात, 8बोध करणाऱ्याने बोध करण्यात ही कृपादाने वापरावीत. देणाऱ्याने औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम दक्षतेने करावे व दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी.
ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम
9प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा. 10बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना, 11श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा. 12आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. 13पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.
14तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका. 15आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. 16परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका.
17वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. 18सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. 19प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा धर्मशास्त्रलेख आहे:
‘सूड घेणे माझ्याकडे आहे,
मी फेड करीन’,
असे प्रभू म्हणतो.
20उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. 21वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर चांगुलपणाने वाइटाला जिंक.

सध्या निवडलेले:

रोमकरांना 12: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन