YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 14

14
विश्वासात दुर्बल असलेल्या लोकांशी सहिष्णुता
1जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका. 2एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बल शाकाहारी अन्न खातो. 3जो सर्व काही खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये कारण देवाने त्याला जवळ केले आहे. 4दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.
5कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसांपेक्षा अधिक श्रेयस्कर मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी. 6जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो; जो खातो तो प्रभूकरता खातो कारण तो देवाचे आभार मानतो आणि जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानतो. 7आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. 8जर आपण जगतो, तर प्रभूकरता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. 9ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे. 10तर मग केवळ शाकाहार करणारा तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा सर्व काही खाणारा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11धर्मशास्त्रात असे लिहिले आहे:
प्रभू म्हणतो,
‘ज्याअर्थी मी जिवंत आहे,
त्याअर्थी माझ्यापुढे
प्रत्येक जण गुडघे टेकील
व प्रत्येक जीभ मी देव आहे,
हे कबूल करील.’
12तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे.
13म्हणून आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण होईल असे काही ठेवू नये. 14मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही. 15अन्नामुळे तुझ्या भावाला दुखवले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस. 16तुम्हांला जे चांगले मिळाले आहे, त्याची निंदा होऊ देऊ नका; 17कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे 18आणि अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो, तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.
19तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावयास हवे. 20अन्नाकरता देवाचे कार्य नष्ट करू नकोस. सर्व प्रकारचे अन्न खाता येईल परंतु जो माणूस दुसऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा रीतीने खातो, तो चूक करतो. 21मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे आणि ज्यामुळे तुझा भाऊ अडखळतो ते न करणे हे चांगले. 22ह्या बाबतीत तुझ्यामध्ये जो विश्वास आहे, तो तू देवासमक्ष स्वत:साठी ठेव. आपणाला जे काही योग्य वाटते ते केल्यामुळे त्याविषयी ज्याच्या मनात दोषभावना निर्माण होत नाही तो धन्य! 23पण शंका असूनही जो खातो तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाच्या आधारे होत नाही आणि जे काही विश्वासाच्या आधारे होत नाही, ते पाप आहे.

सध्या निवडलेले:

रोमकरांना 14: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन