YouVersion लोगो
सर्च आयकॉन

तीत 2

2
ख्रिस्तशिष्याला साजेशी वागणूक
1तू मात्र जे शिक्षणाला अनुसरून आहे, ते शिकव. 2वयस्क पुरुषांनी नेमस्त, समजूतदार व मर्यादशील राहून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ राहावे. 3तसेच वयस्क स्त्रियांनी चालचलणुकीत पवित्र स्त्रियांना शोभेल असे जगावे. त्या चहाडखोर व मद्यपानासक्‍त नसाव्यात; शिक्षण देणाऱ्या असाव्यात. 4त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलांबाळांवर प्रेम करावे, 5त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू व नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
6तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे, म्हणून त्यांना बोध कर. 7सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे. 8टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.
9दासांनी आपल्या धन्यांच्या आज्ञेत राहावे, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, 10त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा त्यांना बोध कर.
ख्रिस्तशिष्याला साजेसे हेतू
11सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, 12-13ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे. 14आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.
15ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये.

सध्या निवडलेले:

तीत 2: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन