YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 12:12-31

1 करिंथकरांस 12:12-31 MRCV

जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे. आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे. समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते? तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे. डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” उलट शरीराचे अशक्त म्हणून समजले जाणारे अवयवही अत्यावश्यक आहेत. आपल्याला वाटते की शरीरामध्ये काही भाग कमी मानाचे आहेत तरी त्यांना आपण विशेष सन्मानाने वागवितो आणि तुच्छ गणले गेलेल्या अवयवांना सुरूप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. सुरूप दिसणार्‍या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा. ते अशासाठी की शरीरामध्ये फूट नसावी, तर सर्व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात. आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत, आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे. सर्व प्रेषित आहे काय? सर्व संदेष्टे आहेत काय? सर्व शिक्षक आहेत काय? प्रत्येकाला चमत्कार करण्याचे दान मिळाले आहे काय? सर्वांना रोग बरे करण्याची दाने मिळाली आहेत काय? सर्वजणांना अन्य भाषेत बोलतात काय? सर्वजण स्पष्टीकरण करतात काय? तेव्हा अधिक उच्चदानांची इच्छा बाळगणे चांगले.