YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 12:12-31

१ करिंथ 12:12-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले. कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे. जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते? पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे. ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते? पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत, आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’ तर उलट, शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. आणि शरीराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते. कारण आपल्या शोभून दिसणार्‍या अवयवांना गरज नाही पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळवले आहे. म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात. आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात. आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहाय्यक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय? सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय? पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा आणि शिवाय, मी तुम्हास एक अधिक चांगला मार्ग दाखवतो.

सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा

१ करिंथ 12:12-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे. आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे. समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते? तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे. डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” उलट शरीराचे अशक्त म्हणून समजले जाणारे अवयवही अत्यावश्यक आहेत. आपल्याला वाटते की शरीरामध्ये काही भाग कमी मानाचे आहेत तरी त्यांना आपण विशेष सन्मानाने वागवितो आणि तुच्छ गणले गेलेल्या अवयवांना सुरूप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. सुरूप दिसणार्‍या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा. ते अशासाठी की शरीरामध्ये फूट नसावी, तर सर्व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात. आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत, आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे. सर्व प्रेषित आहे काय? सर्व संदेष्टे आहेत काय? सर्व शिक्षक आहेत काय? प्रत्येकाला चमत्कार करण्याचे दान मिळाले आहे काय? सर्वांना रोग बरे करण्याची दाने मिळाली आहेत काय? सर्वजणांना अन्य भाषेत बोलतात काय? सर्वजण स्पष्टीकरण करतात काय? तेव्हा अधिक उच्चदानांची इच्छा बाळगणे चांगले.

सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा

१ करिंथ 12:12-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे.1 आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही;” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही.” इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत, शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते; आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्नभिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हांला दाखवतो.

सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा

१ करिंथ 12:12-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते. जर पाय म्हणेल, “मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. जर कान म्हणेल, “मी डोळा नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक आहे. डोळा हाताला म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” उलट, शरीराचे जे अवयव कमजोर दिसतात त्यांच्याविना आपले चालू शकत नाही. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांची आपण खास काळजी घेतो आणि आपल्या कुरूप अंगांना महत्त्व देतो. आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना विशेष महत्त्व मिळावे अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. म्हणून शरीरात फूट नाही, तर अवयव एकमेकांची सारखीच काळजी घेत असतात. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुखावतात किंवा एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सुखावतात. तुम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचे शरीर असून एकेक जण त्याचे अवयव आहात. देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक , नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय? आरोग्य देण्याचे कृपादान सगळ्यांनाच मिळाले आहे काय? सगळेच अपरिचित भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? परंतु तुम्ही अधिक महान कृपादाने मिळवण्यासाठी झटा. मी मात्र तुम्हांला एक अधिक उत्कृष्ट मार्ग दाखवतो.

सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा