YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 4

4
खर्‍या प्रेषितपणाचा स्वभाव
1ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे. 2आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे. 3तुम्ही माझा न्याय केला किंवा कोणत्याही मानवी न्यायालयाने केला; तर मी त्याची जास्त काळजी करत नाही, निश्चित, मी स्वतःचाही न्याय करीत नाही. 4कारण माझा विवेक शुद्ध असला, तरी मी निर्दोष ठरत नाही. प्रभू माझा न्याय करील. 5यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभुच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करील आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.
6आता, बंधुनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोस याला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्या पलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्‍याला कमी व इतरांना मोठे लेखावे, असे तुम्ही करू नये. 7तुम्हाला इतरांपासून वेगळे कोणी केले? तुमच्याजवळ असे काय आहे की जे तुम्हाला मिळालेले नाही? ज्याअर्थी तुम्हाला सर्व मिळाले आहे, तर तुम्हाला मिळाले नाही अशी बढाई का मारता?
8इतक्यातच तुम्हाला जे हवे ते मिळाले आहे, इतक्यात धनवान झाला आहा, आम्हाला सोडून राज्य करीत आहा; तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुम्हाबरोबर राजे झालो असतो. 9मला असे वाटते की परमेश्वराने आम्हा प्रेषितांना विजय यात्रेमध्ये, सर्वात शेवटच्या ठिकाणी मृत्युदंड नेमलेल्यांसारखे ठेवले आहे. आम्ही सर्व सृष्टी, मानव आणि देवदूतांपुढे एक मौज म्हणून झालो आहे. 10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख आहोत, ख्रिस्तामध्ये तुम्ही सर्व सुज्ञ आहा! आम्ही अशक्त आहो, पण तुम्ही सशक्त आहा! आम्ही अप्रतिष्ठित आहो, तुम्ही तर प्रतिष्ठित आहा! 11या घटकेपर्यंत आम्ही भुकेले व तान्हेले, घाणेरडी वस्त्रे घातलेले व अतिशय कठोर वागणूक मिळालेले व बेघर असे आहोत. 12आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो; 13आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहो.
पौलाची विनंती व सूचना
14तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे. 15ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे. 16म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. 17या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवीत आहे. तो प्रभुमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणुकीची तुम्हाला आठवण करून देईल.
18मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण फुगले आहेत. 19परंतु प्रभुची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन. 20परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे. 21तुम्हाला काय आवडेल, मी तुम्हाकडे शिस्तीची काठी घेऊन, की प्रेम भावाने आणि सौम्य आत्म्याने यावे?

सध्या निवडलेले:

1 करिंथकरांस 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन