2
1यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा. 2नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल. 3कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.
जिवंत दगड आणि निवडलेले राष्ट्र
4जो जिवंत दगड बांधणार्यांनी नाकारला, परंतु परमेश्वराने निवडलेला आणि त्यांना मोलवान असलेल्या ख्रिस्ताकडे तुम्ही आला आहात. 5तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर#2:5 किंवा आत्म्याचे मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. 6कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे:
“पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो
निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला,
त्यांच्यावर विश्वास ठेवणारा
कधीही लज्जित होणार नाही.”#2:6 यश 28:16
7आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत,
“जो दगड बांधणार्यांनी नाकारला,
तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”#2:7 स्तोत्र 118:22
8आणि,
“लोकांना ठेच लागण्याचा एक दगड
व अडखळण्याचा एक खडक ठेवतो.”#2:8 यश 8:14
ते अडखळतात, कारण ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत, ज्या शिक्षेसाठी ते पूर्वीच नेमलेले सुद्धा होते.
9परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी. 10पूर्वी तुम्ही ते लोक नव्हता परंतु आता तुम्ही परमेश्वराचे लोक आहात; पूर्वी तुम्हाला दया प्राप्त झाली नव्हती, परंतु आता तुम्हाला दया प्राप्त झाली आहे.
अनीतिमान लोकांमध्ये नीतिमत्वेचे जीवन जगणे
11प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा. 12अनीतिमान लोकांमध्ये अशा प्रकारचे चांगले जीवन जगा, की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील.
13तुम्ही प्रभूकरिता मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्याच्या अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल 14अथवा राज्यपाल असेल, कारण जे अयोग्य गोष्टी करतात त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि जे योग्य गोष्टी करतात, त्यांची प्रशंसा करण्यासाठी ते परमेश्वराकडून पाठविलेले आहेत. 15कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत. 16तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वापरू नका, तर परमेश्वराच्या दासासारखे जगा. 17प्रत्येकाला योग्य आदर दाखवा. विश्वासणार्यांच्या कुटुंबावर प्रीती करा. परमेश्वराचे भय बाळगा व राजाचा मान राखा.
18दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही, तर जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा. 19कारण त्याला परमेश्वराची जाणीव असल्यामुळे जर कोणी मनुष्य अन्यायी दुःखाच्या वेदना सहन करतो, तर ते प्रशंसनीय आहे. 20परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे. 21यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे.
22“त्यांनी कधीही पाप केले नाही;
आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.”#2:22 यश 53:9
23जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले. 24त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.” 25कारण “मेंढरांप्रमाणे तुम्ही परमेश्वरापासून बहकून दूर गेला होता,”#2:25 यश 53:4, 5, 6 परंतु आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे आणि तुमच्या आत्म्याच्या रक्षकाकडे परत आला आहात.