YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 4

4
परमेश्वरासाठी जगणे
1म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो. 2याचा परिणाम असा होतो की, त्यांचे उरलेले ऐहिक जीवन ते मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात. 3कारण गैरयहूदी लोकांप्रमाणे व्यभिचार, कामातुरपणा, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली आणि घृणित मूर्तिपूजा करण्यात तुम्ही बराच वेळ घालविला. 4त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता त्यांच्या बेपर्वा, वाईट जीवनात सामील होत नाही आणि ते तुमची निंदा करतात. 5पण एवढे लक्षात ठेवा की, त्यांना त्यांचा हिशोब त्या परमेश्वराला द्यावा लागेल जे जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास सिद्ध आहेत. 6याच कारणासाठी शुभवार्तेचा प्रचार जे आता मृत झाले आहेत त्यांना करण्यात आला होता, यासाठी की देहामध्ये त्यांचा न्यायनिवाडा मनुष्याच्या प्रमाणानुसार व्हावा परंतु आत्म्यामध्ये त्यांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जिवंत राहवे.
7सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल. 8सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते. 9कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा. 10परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा. 11जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!
विश्वासी असल्यामुळे होणारा छळ
12प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्नीसारख्या वाईट अनुभवांबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे. 13परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल. 14जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे. 15जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये. 16तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे. 17कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल? 18आणि,
“जर नीतिमान लोकांचे तारण कष्टाने होते,
तर अनीतिमान व पापी लोकांचे काय होईल?”#4:18 नीती 11:31
19म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे.

सध्या निवडलेले:

1 पेत्र 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन