5
वडीलमंडळीसाठी आणि इतर लोकांसाठी
1तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो: 2तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा; 3जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा. 4जेव्हा मुख्य मेंढपाळ येतील, तेव्हा गौरवाचा मुकुट तुम्हाला मिळेल, तो कधीच झिजणार नाही.
5त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण,
“परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात
परंतु नम्रजनावर कृपा करतात.”#5:5 नीती 3:34
6परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील. 7तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.
8सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो. 9विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासी लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत.
10तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील. 11त्यांना सदासर्वकाळ अधिकार असो. आमेन.
शेवटच्या शुभेच्छा
12ज्याला मी एकनिष्ठ भाऊ मानतो, त्या सीलासच्या मदतीने मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे, तुम्हाला उत्तेजित करतो आणि अशी साक्ष देतो की, हीच परमेश्वराची खरी कृपा आहे. यामध्येच स्थिर राहा.
13जी बाबेलमध्ये आहे ती, तुमच्याबरोबर एकत्र निवडलेली, तुम्हाला तिच्या शुभेच्छा पाठविते आणि माझा पुत्र मार्क तुम्हाला शुभेच्छा पाठवितो.
14एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने अभिवादन करा.
तुम्ही जे ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हा सर्वांना शांती असो.