1
1येशू ख्रिस्ताचा सेवक आणि प्रेषित शिमोन पेत्र, याजकडून,
ज्यांना आपले परमेश्वर आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या नीतिमत्वाद्वारे आमच्यासारखाच मोलवान विश्वास मिळाला आहे त्यास:
2परमेश्वर आणि आपले येशू प्रभू यांच्या ज्ञानाद्वारे कृपा व शांती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.
एखाद्याचे पाचारण आणि निवड सिद्ध करणे
3त्यांच्या दैवी सामर्थ्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यास पाचारण केले, त्यांच्या ज्ञानाद्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्वगोष्टी आपल्याला दिल्या आहेत. 4याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.
5कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची; 6ज्ञानात आत्मसंयमाची; आत्मसंयमात धीराची; धीरात सुभक्तीची; 7सुभक्तीत बंधुप्रेमाची; बंधुप्रेमात प्रीतीची. 8कारण जर हे गुण तुमच्यामध्ये वाढत असले तर ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात तुम्हाला निष्क्रिय व निष्फळ होण्यापासून राखतील. 9ज्याच्याजवळ हे गुण नाहीत तो दूरदृष्टी नसलेला आणि आंधळा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे.
10यास्तव, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे पाचारण आणि निवड दृढ करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही कधीही अडखळणार नाही किंवा तुमचे पतन होणार नाही, 11तर आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या शाश्वत राज्यात तुमचे भव्य स्वागत होईल.
धर्मग्रंथातील भविष्य
12जरी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत आणि तुमच्याकडे असलेल्या सत्यात तुम्ही निश्चितपणे स्थिर झालेले आहात, तरी या गोष्टींची मी तुम्हाला नेहमीच आठवण करून देईन. 13मला असे वाटते की, जोपर्यंत मी या शारीरिक तंबूमध्ये राहत आहे, तोपर्यंत तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी करणे हे योग्य आहे; 14कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे, जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे. 15माझे निर्गमन झाल्यावर या गोष्टी तुम्हाला सतत लक्षात राहतील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
16चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत. 17त्यांना परमेश्वरपित्याकडून सन्मान आणि गौरव मिळाले, तेव्हा सर्वोच्च गौरवी परमेश्वराकडून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”#1:17 मत्त 17:5; मार्क 9:7; लूक 9:35 18आम्ही त्यांच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून झालेली वाणी आम्ही स्वतः ऐकली आहे.
19आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. 20सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. 21कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.