YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 11

11
शौल याबेश शहराची सुटका करतो
1अम्मोनी नाहाश#11:1 नाहाश अम्मोनी राजा ज्याने गाद व रऊबेनी लोकांचे उजवे डोळे उपटले आणि इस्राएलमध्ये आतंक आणि भय पसरवून त्यांचा फार छळ केला. याने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.”
2परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.”
3याबेशचे वडील त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.”
4जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला. 5त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले.
6जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला. 7त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले. 8बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते.
9जे निरोप घेऊन आले होते त्यांना त्यांनी सांगितले, “याबेश-गिलआदच्या पुरुषांना सांगा, ‘उद्या सूर्य तापलेला असेल, त्या वेळेपर्यंत तुमची सुटका केली जाईल.’ ” जेव्हा निरोप्यांनी जाऊन हे वर्तमान याबेशच्या लोकांना सांगितले तेव्हा ते आनंदित झाले. 10याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.”
11दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.
शौलाची राजा म्हणून स्थापना
12तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.”
13परंतु शौल म्हणाला, “आज कोणालाही जिवे मारले जाणार नाही, कारण आज याहवेहने इस्राएलची सुटका केली आहे.”
14नंतर शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आपण गिलगालास जाऊ आणि तिथे राजपदाची पुनर्स्थापना करू.” 15तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले आणि त्यांनी याहवेहच्या उपस्थितीत शौलाला राजा केले. तिथे त्यांनी याहवेहसमोर शांत्यर्पणाचे यज्ञ केले आणि शौलाने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोठा उत्सव साजरा केला.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन