1 शमुवेल 13
13
शमुवेल शौलाचा निषेध करतात
1शौल राजा झाला तेव्हा तो तीस वर्षांचा होता आणि त्याने बेचाळीस वर्षे इस्राएलवर राज्य केले.
2शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.
3गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!” 4तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.
5तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला. 6आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले. 7काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले.
परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते. 8शमुवेलने वेळ ठरविल्याप्रमाणे शौलाने सात दिवस वाट पाहिली; परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि शौलाची माणसे विखरू लागली. 9तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले. 10त्याने होमार्पणाची समाप्ती करताच शमुवेल आला आणि शौल त्याला अभिवादन करण्यास बाहेर गेला.
11तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?”
शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते, 12मला वाटले, ‘आता पलिष्टी लोक गिलगाल येथे माझ्याविरुद्ध चाल करून येतील आणि मी अजूनही याहवेहकडून साहाय्यासाठी विनंती केली नाही.’ म्हणून होमार्पण करणे मला भाग पडले.”
13शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझा परमेश्वर यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते. 14परंतु आता तुझे राज्य टिकणार नाही; याहवेहने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे आणि आपल्या लोकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही.”
15नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.
निःशस्त्र इस्राएली लोक
16शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा#13:16 काही मूळ प्रतींनुसार गेबा येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला. 17छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली, 18दुसरी बेथ-होरोनकडे आणि तिसरी रानासमोर असलेले सेबोईम खोर्याच्या सीमेकडे गेली.
19त्या दिवसांत संपूर्ण इस्राएली देशात लोहार सापडत नव्हते, कारण पलिष्टी लोक म्हणाले होते, “कदाचित इब्री लोक तलवारी किंवा भाले तयार करतील!” 20म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्हाडी किंवा विळे#13:20 किंवा नांगराच्या टोकांना यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत. 21नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल#13:21 अंदाजे 8 ग्रॅ., व कुर्हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल#13:21 अंदाजे 4 ग्रॅ. असा दर होता.
22म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती.
योनाथान पलिष्ट्यांवर हल्ला करतो
23तेव्हा पलिष्टी सैन्यांची एक तुकडी मिकमाशाच्या घाटाकडे गेली होती.
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 13: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.