1 शमुवेल 17
17
दावीद आणि गल्याथ
1पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली. 2शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले. 3पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते.
4तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.#17:4 सुमारे तीन मीटर 5त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते#17:5 अंदाजे 58 कि.ग्रॅ.; 6त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व त्याच्या कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती. 7विणकर्याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते.#17:7 अंदाजे 7 कि.ग्रॅ. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.
8गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. 9जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.” 10तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” 11पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले.
12दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता. 13इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते. 14दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले, 15परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.
16तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.
17एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा. 18त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये. 19ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”
20सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईच्या स्थानी जात होते. 21इस्राएली आणि पलिष्टी सेना समोरासमोर उभ्या राहिल्या. 22दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले. 23तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले. 24त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत.
25इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.”
26दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”
27ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.”
28जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलत असताना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.”
29दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?” 30नंतर तो दुसर्या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले. 31दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.
32दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”
33शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”
34परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले, 35मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले. 36आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे. 37ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.”
शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”
38शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला. 39दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला.
तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला. 40नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.
41त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. 42पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले. 43तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला. 44तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.”
45दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो. 46आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत. 47येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.”
48पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला. 49दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.
50अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले.
51दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले.
जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की त्यांचा नायक मरण पावला त्यांनी तिथून पळ काढला. 52तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ#17:52 काही मूळ प्रतींनुसार एक खोरे व एक्रोन येथवर पडलेले होते. 53इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.
54दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली.
55शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?”
अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.”
56राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.”
57दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.
58शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?”
दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 17: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.