1 शमुवेल 6
6
कोश इस्राएलात परत येतो
1याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता, 2तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्यांस बोलाविले आणि विचारले, “आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा.”
3ते म्हणाले, “जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल.”
4पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?”
त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्यांना त्याच पीडांनी पीडले आहे. 5ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील. 6फारोह व इजिप्तच्या लोकांनी केली तशी तुम्ही तुमची हृदये कठीण का करता? इस्राएलच्या याहवेहने त्यांना कठोरपणाने वागविले होते, म्हणून इस्राएली लोकांना त्यांनी जाऊ दिले नव्हते का?
7“तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा. 8याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या, 9परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”
10तेव्हा त्यांनी हे केले. त्यांनी तशा दोन दुभत्या गाई घेतल्या आणि त्यांना गाडीला जुंपले आणि त्यांच्या वासरांना गोठ्यामध्ये ठेवले. 11त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या. 12तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.
13यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला. 14ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला. 15लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले. 16पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.
17पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या. 18आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.
19परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला. 20आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?”
21तेव्हा त्यांनी किर्याथ-यआरीमच्या लोकांकडे हा संदेश देत दूत पाठविले, “पलिष्ट्यांनी याहवेहचा कोश परत केला आहे. इकडे या आणि तो तुमच्या नगराकडे घेऊन जा.”
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 6: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.