2
थेस्सलनीका येथे पौलाचे सेवाकार्य
1प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणे काही व्यर्थ ठरले नव्हते हे तुम्हाला माहीतच आहे. 2पूर्वी फिलिप्पैमध्ये आम्हाला दुःख व अपमानकारक वागणूक सहन करावी लागली हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु आमच्या परमेश्वराच्या साहाय्याने भयंकर विरोध असतानाही आम्ही परमेश्वराची शुभवार्ता सांगण्याचे धैर्य केले. 3जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे. 4उलट, आम्ही परमेश्वराला मान्य असलेले व जी शुभवार्ता आमच्यावर सोपवून दिली आहे ज्यापुढे बोलतो. आम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर परमेश्वराला करतो जे हृदये पारखणारे आहेत. 5तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत. 6आम्ही लोकांकडून म्हणजे, तुमच्याकडून किंवा दुसर्या कोणाकडूनही स्तुतीची कधीच अपेक्षा केली नाही. 7वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता.
जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला. 8तसेच आम्ही तुमची काळजी घेतली. आम्ही तुमच्यावर एवढी प्रीती केली की आम्ही आनंदाने केवळ परमेश्वराची शुभवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनही देण्यास तयार होतो. 9बंधू आणि भगिनींनो, आम्ही केलेले कष्ट आणि परिश्रम हे तुम्हाला आठवत असतील; परमेश्वराच्या शुभवार्तेचा प्रचार तुम्हाला करीत असताना आमचे ओझे कोणावर पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम केले. 10तुमच्यातील प्रत्येकाशी आमचे वागणे पवित्र, नीतीने व निर्दोष होते, याला तुम्ही विश्वासणारे स्वतः आणि परमेश्वर साक्षी आहेत. 11पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे, 12तुम्हाला उत्तेजन, सांत्वन आणि विनंती करून सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या गौरवी राज्यात बोलाविले आहे, त्यांना शोभेल असे जीवन जगा.
13परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे. 14कारण बंधू आणि भगिनींनो, यहूदीयामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये असलेल्या परमेश्वराच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झालात म्हणून स्वतःच्या बांधवांकडून तुम्हाला दुःख सहन करावे लागले, त्याच गोष्टी यहूदी लोकांकडूनही या मंडळ्यांना सहन कराव्या लागल्या. 15त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले, 16आम्ही त्यांच्याशी संवाद करू नये, जेणे करून गैरयहूदीयांचे तारण होईल, म्हणून ते आम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते आणि अशा रीतीने त्यांच्या पापांचे माप भरत आले आहे. परंतु आता शेवटी परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर#2:16 किंवा त्यांच्यावर पूर्णपणे आला आला आहे.
थेस्सलनीकाकरांना भेटण्यास पौलाची ओढ
17बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हापासून शरीराने दूर असलो, पण विचाराने नव्हे, आमच्या प्रबळ इच्छेने तुम्हाला भेटण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला. 18आम्ही तुमच्याकडे येण्याचा, मी स्वतः पौलाने वारंवार प्रयत्न केला. परंतु सैतानाने आम्हाला अडविले. 19आमची आशा, आमचा आनंद, आपल्या प्रभू येशूंच्या पुनरागमनासमयी त्यांच्या सान्निध्यात जो आमचा आशेचा मुकुट तो काय? ते तुम्हीच आहात ना? 20कारण तुम्हीच आमचे गौरव आणि आनंद आहात.