1 तीमथ्य 1
1
1परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,
2विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,
परमेश्वर आपले पिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.
तीमथ्याला खोट्या शिक्षकांचा विरोध करण्याचे काम सोपविले जाते
3-4मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये. 5आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी. 6या गोष्टी सोडून अनेकजण निरर्थक बोलण्याकडे वळले आहेत. 7ते नियमशास्त्राचे शिक्षक होण्यास अभिलाषी आहेत, परंतु ज्या गोष्टींबद्दल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात आणि सांगतात त्या गोष्टी त्यांनाच समजत नाहीत.
8आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर. 9नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे 10जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे. 11जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे.
पौलाला प्रभूची कृपा
12मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले. 13मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले. 14ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे.
15ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे. 16परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते. 17जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.
तीमथ्याच्या कार्याचे नवीनीकरण
18माझ्या मुला, तीमथ्या, माझी तुला ही आज्ञा आहे: संदेष्ट्यांच्याद्वारे तुझ्याविषयी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, तू त्यांच्याद्वारे उत्तम युद्ध करावे. 19आणि विश्वास व चांगल्या विवेकशीलतेस घट्ट बिलगून राहा, ज्यांनी त्याचा नकार केला त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. 20हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.
सध्या निवडलेले:
1 तीमथ्य 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.