5
विधवा, पाळक व दास याबाबत सल्ला
1वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल. 2वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.
3ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर. 4परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो. 5जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते. 6परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. 7त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग. 8परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्यापेक्षा वाईट आहे.
9जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे, 10जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.
11परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात, 12आणि म्हणून आपली पहिली प्रतिज्ञा मोडल्याबद्दल त्या आपल्यावर दंड ओढवून घेतात. 13शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे. 14म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा व कुटुंब चालवावे; विरोध करणार्याला निंदा करण्याचे कोणतेही निमित्त सापडू नये. 15कारण असे करून काही विधवा यापूर्वीच मागे फिरून सैतानाच्या मागे गेल्या आहेत.
16जर कोणी विश्वासी स्त्री विधवांची काळजी घेत आहे, तर तिने त्यांची मदत करीत राहावे आणि मंडळीवर त्यांचे ओझे टाकू नये म्हणजे ज्या विधवा खरोखर गरजवंत आहेत, त्यांना मंडळी मदत करू शकेल.
17जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. 18कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको”#5:18 अनु 25:4 आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”#5:18 लूक 10:7 19दोन किंवा तीन साक्षीदारांनी आरोप ठेवल्याशिवाय वडिलांविरुद्धच्या तक्रारीकडे लक्ष देऊ नये. 20जे वडील पाप करीत असतात त्यांचा सर्वांच्यासमक्ष निषेध कर म्हणजे इतरांना त्याचे भय राहील. 21परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आणि निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, या सूचना कोणताही भेदभाव न करता पाळ. पक्षपाताने काहीही करण्यात येऊ नये.
22अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख.
23यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस.
24अनेक माणसांची पापे आधीच उघड होतात आणि न्यायनिवाड्यासाठी त्यांच्यापुढे जातात आणि कित्येकांची पापे त्यांच्यामागून जातात. 25अशाच प्रकारे काही चांगली कार्ये आधी उघड होतात आणि जी इतर प्रकारची आहेत, ती कायमची गुप्त राहू शकत नाहीत.