2 इतिहास 24
24
योआश मंदिराची दुरुस्ती करतो
1जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती. 2यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले. 3यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या.
4काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले. 5त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही.
6तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?”
7आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता.
8राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली. 9तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा. 10सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले. 11जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. 12राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले.
13कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले. 14जेव्हा त्यांनी ते काम संपविले, त्यांनी उरलेले पैसे राजा आणि यहोयादा यांच्याकडे आणले आणि त्यातून याहवेहच्या मंदिरासाठी वस्तू बनविल्या: विधीसाठी आणि होमार्पणासाठी वस्तू, आणि ताटेसुद्धा व सोन्या-चांदीच्या इतर वस्तू. जोपर्यंत यहोयादा जिवंत होता, तोपर्यंत याहवेहच्या मंदिरात निरंतर होमार्पण केले जात होते.
15यहोयादा आता पूर्ण वयस्कर झाला होता आणि तो वयाच्या एकशे तिसाव्या वर्षी मरण पावला. 16इस्राएलमध्ये परमेश्वरासाठी आणि त्यांच्या मंदिरासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे, त्याला दावीदाच्या नगरात राजांबरोबर पुरण्यात आले.
योआशची दुष्टाई
17यहोयादाच्या मृत्यूनंतर, यहूदीयाचे अधिकारी आले आणि त्यांनी राजाला आदरयुक्त वंदन केले आणि त्याने त्यांचे ऐकले. 18त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे मंदिर सोडून दिले, आणि अशेरा खांब आणि मूर्त्या यांची पूजा केली. त्यांच्या या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला. 19जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही.
20मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ”
21परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले. 22जखर्याहचे वडील यहोयादा याने त्याच्यावर जो दयाळूपणा केला होता त्याची राजा योआशाने आठवण केली नाही, परंतु त्याने त्याच्या पुत्राला ठार मारले, जो त्याच्या मरणाच्या अवस्थेत म्हणाला, “याहवेह हे पाहतील आणि तुला त्याचा हिशोब मागतील.”
23वर्षाच्या शेवटी,#24:23 अंदाजे वसंत ऋतूत अरामच्या सैन्याने योआशविरुद्ध युद्धासाठी कवायत केली; त्याने यहूदीया आणि यरुशलेमवर आक्रमण केले आणि लोकांच्या सर्व नेत्यांना ठार केले. त्यांनी लूट केलेला सर्व माल दिमिष्कातील त्यांच्या राजाकडे पाठवला. 24जरी अरामी सैन्य थोडीच माणसे बरोबर घेऊन आले होते, तरी याहवेहनी त्यांच्या हाती पुष्कळ मोठे सैन्य दिले. कारण यहूदाहने त्यांच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेह यांना सोडले होते, योआशवर न्यायदंडाची कारवाई करण्यात आली. 25जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे.
26ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद#24:26 किंवा योशाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा#24:26 किंवा शोमेर पुत्र. 27त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 24: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.