YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 26

26
यहूदीयाचा राजा उज्जीयाह
1तेव्हा यहूदीयाच्या सर्व लोकांनी उज्जीयाहला घेतले, जो सोळा वर्षांचा होता, त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा म्हणून निवडले. 2अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता.
3उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती. 4त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. 5जखर्‍याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.
6तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली. 7परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध आणि गुर-बाल येथे राहणार्‍या अरब लोकांविरुद्ध आणि मऊनीमी लोकांविरुद्ध लढण्यास मदत केली. 8अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता.
9उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली. 10त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.
11उज्जीयाहकडे एक प्रशिक्षित सैन्य होते, हनन्याह हा राजेशाही अधिकाऱ्यांपैकी एक होता, याच्या मार्गदर्शनाखाली सचिव ईयेल आणि मासेयाह या अधिकाऱ्याने जमविलेल्या संख्येनुसार विभाग करून ते युद्ध करण्यास सुसज्जित होते. 12योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती. 13त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते. 14उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला. 15यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती.
16परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला. 17अजर्‍याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले. 18ते उज्जीयाह राजास भेटले आणि म्हणाले, “उज्जीयाह, याहवेहसाठी धूप जाळणे तुला योग्य नाही. धूप जाळण्यासाठी अहरोनाचे वंशज, याजकांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्या पवित्रस्थानातून बाहेर पड, कारण तू विश्वासू राहिला नाहीस आणि परमेश्वर याहवेह यांच्याकडून तुझा सन्मान केला जाणार नाही.”
19उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला. 20जेव्हा अजर्‍याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.
21उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात#26:21 किंवा जिथून तो त्याच्या जबाबदारीतून मोकळा करण्यात आला होता तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.
22उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत. 23उज्जीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि राजांच्या मालकीच्या स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले, कारण लोक म्हणाले, “त्याला कुष्ठरोग झाला होता.” आणि त्याचा वारस त्याचा पुत्र योथाम राजा झाला.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 26: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन