प्रेषित 19
19
इफिसमध्ये पौल
1अपुल्लोस करिंथ येथे असताना, पौल अंतर्भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तिथे त्याला काही शिष्य आढळले. 2त्याने त्यांना विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?”
त्यांनी उत्तर दिले, “नाही, पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.”
3तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?”
“योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले.
4मग पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता. त्याने लोकांना जो त्याच्यामागून येणार होता त्या येशूंवर विश्वास ठेवण्यास सांगितले.” 5हे ऐकल्यानंतर, त्यांचा प्रभू येशूंच्या नावात बाप्तिस्मा करण्यात आला. 6मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले. 7ते सर्व बारा पुरुष होते.
8मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला. 9परंतु काहीजण हटवादी झाले; त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आणि जाहीरपणे द्वेषाच्या भावनेने त्या मार्गाविषयी विषयी बोलू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघून गेला व शिष्यांना आपल्याबरोबर घेऊन त्याने तुरन्नाच्या व्याख्यानगृहात रोज संवाद केला. 10असे दोन वर्षे ते सातत्याने करीत राहिले. त्यामुळे आशिया प्रांतात राहणार्या सर्व यहूदी व गैरयहूदी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.
11परमेश्वराने पौलाद्वारे असाधारण अशी आश्चर्यकृत्ये केली, 12त्यामुळे असे झाले की, ज्या रुमालांना आणि अंगावरील वस्त्रांना पौलाचा फक्त स्पर्श झाला होता, ते रुमाल व वस्त्र आजार्यांकडे नेले आणि त्यांचे आजार बरे झाले आणि दुरात्मे त्यांना सोडून गेले.
13काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, “ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ.” 14स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते. 15एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?” 16मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले.
17या घटनेची वार्ता लागलीच सर्व इफिसमध्ये राहणारे यहूदी व ग्रीक यांना कळली, तेव्हा त्या सर्वांमध्ये भीती निर्माण झाली आणि प्रभू येशूंचे नाव अत्यंत आदरणीय मानले गेले. 18ज्या अनेकांनी विश्वास ठेवला होता ते आता पुढे आले आणि जे काही त्यांनी केले होते त्याची जाहीर कबुली दिली. 19अनेक लोक जे जादूटोणा करीत होते, त्यांनी त्यांची पुस्तके एकत्रित आणली आणि ती सर्व लोकांसमोर जाळून टाकली. त्यांनी त्या पुस्तकांची किंमत मोजली, तेव्हा ती पन्नास हजार चांदीची नाणी#19:19 हे एक चांदीचे नाणे असून ती एका दिवसाची मजुरी होती एवढी झाली. 20या रीतीने प्रभूचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले.
21हे सर्व झाल्यानंतर, मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमला जावे, असे पौलाने आपल्या मनात#19:21 किंवा आत्म्यात ठरविले व म्हटले, “तिथे गेल्यानंतर, मी रोम या ठिकाणीही भेट दिली पाहिजे.” 22त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्तला मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला.
इफिसमध्ये दंगा
23त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली. 24देमेत्रिय नावाच्या चांदीच्या कारागिराने अर्तमीस देवीचे चांदीचे देव्हारे तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता. 25एकदा त्याने या सारखाच व्यवसाय करणार्या कारागिरांनादेखील एकत्र बोलाविले आणि तो त्यांना म्हणाला: “माझ्या मित्रांनो, या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. 26तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत. 27आता यामध्ये धोका हा आहे की, आपल्या धंद्याचे चांगले नाव नाहीसे होईल, इतकेच नव्हे तर महादेवी अर्तमीसच्या मंदिराची सुद्धा अपकीर्ती होईल आणि ही देवता, जिची उपासना सर्व आशियामध्ये व जगामध्ये केली जाते, तिचे दैवी वैभव लुटून नेले जाईल.”
28त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!” 29लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले. 30समुदायापुढे स्वतः जावे, असे पौलाच्या मनात होते, परंतु शिष्य त्याला तसे करू देईनात. 31त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली.
32सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते. 33काही यहूद्यांनी आलेक्सांद्राला पुढे ढकलले, मग आलेक्सांद्राने लोकांपुढे बचावाचे भाषण करण्यासाठी, शांत व्हावे म्हणून हाताने खुणावले. 34परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले.
35सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का? 36तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका. 37तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही. 38जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात. 39जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील. 40वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.” 41असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.
सध्या निवडलेले:
प्रेषित 19: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.